नेवरे, रत्नागिरीजवळ वसलेले कोकणातील निसर्गरम्य गाव. एका बाजूला अथांग अरबी समुद्राचा किनारा, तर दुसऱ्या बाजूला डोंगररांगा आणि या दोहोंच्या सान्निध्यात वसलेले हे गाव म्हणजे जणू निसर्गाने स्वतःच्या हाताने घडवलेले एक सुंदर चित्र.
नेवरे ग्रामी वसलेल्या लावगणवाडी ग्रामस्थांना एकत्र करून कै. कृष्णा सदाशिव घडशी यांनी ३ जुलै १९८३ साली श्री गजानन महाराज सेवा मंडळाची स्थापना केली. दि. ५ नोव्हेंबर १९८३ साली बलिप्रतिपदा या शुभदिनी २०० कौलांचे छप्पर तयार करून वटवृक्षाच्या खाली महाराजांच्या मंदिराची निर्मिती केली. या मंदिरात श्री गजाजन महाराज , श्री गणपती , श्री राम - लक्ष्मण - सीतामाई यांच्या मूर्तीची स्थापना करून घेतली. सन १९८८ मध्ये लावगणवाडीतील भक्तगणांनी देणगी रूपाने जमेल तशी रक्कम जमा केली व प्रत्येक घरातील व्यक्तीने श्रमदानातून २१ x २१ फूट चौथरा बनवून ११ x ११ फुटाचा गाभारा तयार करून मंदिर निर्माण केले. १४ मे १९८९ साली महाराजांच्या मूर्तीची स्थापना करून विधियुक्त दैविक उपासना सुरु केल्या गेल्या. तसेच महाराजांचा प्रकटदिन, रामनवमी, गुरुपौर्णिमा, समाधीदिन व नवरात्र उत्सव सोहळा साजरा होऊ लागला.
लावगणवाडी मध्ये पाण्याचा स्रोत नसल्याने दूर दूरहून महिला पाणी भरायच्या. महिलांचे हे कष्ट दूर व्हावेत म्हणून सर्व गावकर्यांनी मिळून संस्थापक कै. कृष्ण घडशी यांचेमार्फत महाराजांना साकडे घालण्यात आले आणि चमत्कार झाला ....... महाराज्यांच्या मूर्तीच्या मागच्या बाजूस काळ्या कभिन्न पाषाणात पाणी लागले . जवळ जवळ ७५ फूट खोल विहीर महाराजांनी तयार करून घेतली. सन १९९७ मध्ये विहिरीचे सर्व काम वाडीतील लोकांनी दिवस रात्र श्रमदान करून पूर्ण केले . सदर विहिरीला बारा महिने मुबलक पाणी असते. त्यावरच वाडीतील लोकांसाठी नळपाणी योजना तयार करण्यात आली.
सन २००२ साली भक्तांच्या सोयीसाठी मंदिराच्या शेजारील जागेत भव्य सभामंडप तयार करण्यात आला. या मंडपामध्ये नेवरे ग्रामस्थांना लग्न विधी व इतर सोहळे कमी खर्चात करता यावे याची सोय मंदिर कार्यकारिणीने केली आहे.
दि २२.११.२००९ साली श्री गजाजन महाराज्यांच्या जुन्या मूर्तीचा जीर्णोद्धार करण्यात आला. जयपूर येथील मूर्तिकाराकडून पांढरी संगमरवरी चिलीमधारी मूर्ती बनवून शेगाव येथून नेवरे गावी आणण्यात आली. सात ब्राह्मणांच्या द्वारे तीन दिवस विधी युक्त मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्यात आला. त्यासाठी शेगाव स्थानी यज्ञ कर्म करणारे वेड ज्ञानी अशा पंडितांकडून प्राणप्रतिष्ठा विधी करण्यात आला. तेव्हापासून महाराजांची विविध प्रचिती अनेक भक्तांना दाखवून दिल्या.
२०११ साली गजवदन युक्त असं भव्य मंदिर प्रवेशद्वार करण्यात आले.
फेब्रुवारी २०११ चांदीच्या गोमुखी पादुका खामगाव येथील प्रख्यात सराफ मे . विश्वकर्मा ज्वेलर्स यांचेकडून शेगाव मंदिरात पूजन करून नेवरे मंदिरात प्रस्थापित करण्यात आल्या .
२०१७ साली महाराज्यांचा चांदीचा मुखवटा व चांदीची प्रभावळ मे . विश्वकर्मा ज्वेलर्स यांचेकडून बनवण्यात आल्या व शेगाव मंदिरी परायणस्थळी ११.०० वाजता आरती समय पूजन करून नेवरे मंदिरात प्रस्थापित झाल्या हि महाराजांची कृपा...............
नोव्हेंबर २०१९ साली श्री राम - लक्ष्मण- सीतामाई , श्री विठ्ठल रखुमाई तसेच श्री हनुमान यांच्या मूर्तीचा विधियुक्त प्राण प्रतिष्ठा सोहळा वेद ज्ञानी पंडितांकडून संपन्न झाला व मंदिराचा पूर्ण कायापालट झाला .
मंदिर विकास व महाराजांचा प्रचार दिवसेंन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात वाढत चालला. प्रख्यात जागृत देवस्थान श्री गणपतीपुळे मंदिर नेवरे येथून ७ कि.मी. दूर आहे . गणपतीपुळे येथे येणारे कित्येक भक्तगण श्री गजानन महाराज मंदिराला हि आवर्जून भेट देत असतात.
भाविकांच्या निवासाची सोय म्हणून कमीत कमी रकमेत शेगाव संस्थानच्या धर्तीवर खोली उपलब्ध करून देण्याच्या शुद्ध हेतूने मंदिर कार्यकारिणीने श्री गजानन महाराज भक्त निवास निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. या साठी श्री अनिकेत हर्षे आणि परिवाराकडून मंदिराजवळील पाच गुंठे जागा मंदिर प्रशासनाला विना मोबदला दिली आहे. दि १२ फेब्रुवारी २०२३ रोजी या जागेवर श्री अनिकेत हर्षे यांचे हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. भक्त निवास आपण सर्वांच्या देणगीतून श्री गजानन महाराज करून घेतील नि:संशय .....